Ad will apear here
Next
समांतर चित्रपट चळवळीचे पुरस्कर्ते : मृणाल सेन
मृणाल सेननिरनिराळे प्रयोग करून भारतीय चित्रपटसृष्टीचे नाव जागतिक पटलावर आणणारे बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांचा १४ मे हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
................
मृणाल सेन यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी बांगलादेशमधील फरीदपूरमध्ये झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात जायचे ठरवले आणि १९५५मध्ये त्यांनी ‘रातभोर’ या आपल्या पहिल्या बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर सुरुवातीच्या काळात ‘नील आकाषेर नीचे’, ‘बाईशे श्रावण’, ‘आकाश कुसुम’ अशा काही चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. काल्पनिक कथानकांमध्ये रमणारे मृणाल सेन हळूहळू वास्तविकतेकडे वळत गेले आणि पुढील काही काळात वास्तविकतेवर आधारित काही चित्रपट त्यांनी तयार केले. त्यापैकी १९६९मध्ये आलेल्या त्यांच्या ‘भुवन शोम’ या चित्रपटाने इतिहास रचला. हा चित्रपट खूप गाजला आणि यानंतर त्यांना एक नवी दिशा मिळाली. 

मृणाल सेन आणि सत्यजित रेस्वातंत्र्यानंतर विसाव्या शतकात भारतीय चित्रपटसृष्टीत हळूहळू नवीन प्रयोग होऊ लागले. त्या काळात विशेषतः सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या तीन बंगाली दिग्दर्शकांनी भारतीय चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थाने नवीन दिशा, नवीन आकार दिला. या तिघांनी अनेक प्रादेशिक सिनेमांची निर्मिती केली. वेगवेगळे विषय घेऊन नवीन पायंडे पाडले. प्रादेशिक दिग्दर्शकांना प्रेरणा देण्याचे काम केले. रे यांच्या वास्तववादी शैलीला छेद देऊन सेन यांनी अनेक नवीन धाटणीचे चित्रपट निर्माण केले. या तिघांच्याही सिनेमांच्या विषयांचा आवाका कोणत्याही एका विशिष्ट भागापुरता मर्यादित नव्हता. तो वैश्विक होता. त्यामुळे या तिघांचेही चित्रपट केवळ बंगालीपुरते मर्यादित न राहता ते चित्रपटाच्या जागतिक पटलावर झळकले. भारतापेक्षाही भारताबाहेर जास्त प्रेक्षक मिळवण्यात या तिघांनाही यश मिळाले. त्यांचा प्रेक्षक जागतिक होता. 

मृणाल सेन म्हटले, की पांढरा सदरा-लेंगा, जाड भिंगांचा चष्मा आणि बोटांमध्ये अडकवलेली सिगारेट अशी छबी आजही डोळ्यांसमोर येते. ‘माझे प्रयोग कधीही संपणार नाहीत,’ असे नेहमी म्हणणारे सेन हे पुढे एक बंडखोर दिग्दर्शक म्हणून समोर आले. सुरुवातीपासूनच डाव्या आणि साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली असलेल्या सेन यांच्यावरचा हा प्रभाव त्यांच्या अनेक चित्रपटांमधूनही दिसून येतो. ते अनेक चळवळींविषयीचे भान ठेवून वावरणारे होते. आपल्या चित्रपटांमधून ते राजकीय भूमिका थेटपणे मांडत. याच प्रभावाखाली असताना आपल्यातील बंडखोर तरुणाची भूमिका मांडण्याच्या उद्देशाने त्यांनी १९७०च्या काळात ‘इंटरव्ह्यू’, ‘कलकत्ता-७१’ आणि ‘पदातिक’ अशा राजकीय चित्रपटांची श्रृंखला आणली. आयुष्याच्या शेवटपर्यंत सेन हे एक सामान्य आयुष्य जगले आणि हेच सामान्य आयुष्य त्यांनी आपल्या चित्रपटांमधूनही मांडण्याचा प्रयत्नही केला. 

यानंतरच्या काळात मात्र त्यांनी मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव काहीसा बाजूला सारून ‘भुवन शोम’, ‘माटिर मानिश’, ‘एकदिन प्रतिदिन’, ‘ओघ ओरी कथा’, ‘एक दिन अचानक’, ‘अकालेर संधाने’, ‘खंडहर’ अशा काही चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांमधून त्यांनी सामाजिक आशय मांडले, मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या. या व्यतिरिक्त ‘महापृथ्वी’, ‘अंतरिन’, ‘जेनेसिस’, ‘आमार भूवन’, ‘पुनश्च’, ‘अबाशेशे’, ‘प्रतिनिधी’, ‘कोरस’, ‘परशूराम’, ‘चलचित्र’, ‘मतिरा मनीषा’ अशा त्यांच्या चित्रपटांचा उल्लेख आजही होताना दिसतो. 

ऋत्विक घटकसतत नावीन्याची कास धरलेल्या सेन यांनी आपल्या कारकिर्दीत २८ चित्रपट, १४ लघुपट आणि पाच डॉक्युमेंटरी केल्या आहेत. दादासाहेब फाळके आणि पद्मभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसहित २० राष्ट्रीय आणि १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. २००२मध्ये आलेला ‘आमार भुवन’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ठरला. सत्यजित रे आणि ऋत्विक घटक या दिग्गज दिग्दर्शकांच्या पंगतीत बसणारे मृणाल सेन हे अखेरचे दिग्दर्शक होते. या तिघांनी भारतीय चित्रपटात नवचित्रपटास समांतर ओळख मिळवून देणारे एक युग निर्माण केले.

३० डिसेंबर २०१८ रोजी मृणाल सेन यांचे निधन झाले.

(मृणाल सेन यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(सत्यजित रे यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(ऋत्विक घटक यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZTMCM
Similar Posts
सत्यजित रे, भालजी पेंढारकर, लिओनार्दो दा व्हिन्सी, स्वाती चिटणीस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांची जन्मशताब्दी आजपासून (२ मे २०२०) सुरू होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर आणि अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचा दोन मे हा जन्मदिन. तसेच, जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा व्हिन्सी यांचा दोन मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’.. १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language